उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) शिवसेना पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे.ग्रामीण भागात सर्वच नागरिकांसोबत संवाद साधण्याचा महत्त्वाचा दुवा शाखाप्रमुख आहे.शिवसेनेचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवायचे असेल तर शाखाप्रमुखांनी मतदारांशी, नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधून शिवसेना घराघरात पोहोचवली पाहिजे.त्यासाठी शाखाप्रमुख पद व त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र कालांतराने शाखाप्रमुख हा काम करीत नसल्याने कमकुवत झाला.अनेक ठिकाणी शाखाप्रमुख काम करत नसल्याने त्या त्या भागातील नागरिकांशी मतदारांशी त्यांच्या संवाद तुटला आहे. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो तिथे मात्र शाखाप्रमुख पाहिजे त्या पद्धतीने काम करताना दिसत नाहीत त्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे.शाखा प्रमुखाचे ग्रामीण भागात खूप मोठे योगदान आहे हे कोणी विसरून चालणार नाही आता मात्र शाखाप्रमुखांना चार्ज करायची वेळ आली आहे.असे परखड व आक्रमक मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उरण येथे मांडले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने उरण विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिकांची संघटनात्मक मोट बांधण्यासाठी व पुढील आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी उरण तालुक्यातील मल्टीपर्पज हॉल टाऊनशिप येथे करण्यात आले होते. यावेळी भास्कर जाधव बोलत होते.भास्कर जाधव यांनी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, कोकण युवा सेना प्रमुख- शिरसाठ,जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील,उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, रायगड जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर,जिल्हा निहाय वक्ता मनीषा ठाकूर,रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी,खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे,संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, मेघा मिस्त्री, ज्योती म्हात्रे- संघटिका,शिव विधी व न्याय सेवा उरण तालुका वर्षा पाठारे, उरण तालुका संघटक बी एन डाकी, पनवेल तालुका प्रमुख महेंद्र गायकर,उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, संपर्क प्रमुख दिपक भोईर,द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख जगजीवन भोईर,शहर संघटक महेश वर्तक,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार घरत, उरण शहर संघटक संदीप जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.भास्कर जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना महायुतीच्या विविध योजना, निर्णयावर कडाडुन टीका केली. भाजपा ने राज्यात सुरू असलेल्या परिवहन सेवेच्या महामंडळाचे सरकारीकरण करण्याचे वचन दिले होते ते वचन पूर्ण केले नाही शिवाय कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार थकविले आहे.कृषी कर्जमाफीचा आश्वासन दिले होते ते अजूनही पूर्ण झाले नाही योग्य वेळ आल्यावर कृषी कर्ज माफ करू असे सांगतात पण ते योग्य वेळ कधी येईल ? महिलांना महिन्याला २१०० रुपये देणार असे सांगितले तिथेही लाडक्या बहिणीची फसवणूक केली. निवडणुकीच्या तोंडावर ही अशी योजना त्याने सुरू केली. सरकारचे महिलांच्या मतावर डोळा आहे त्यामुळे योजना सुरू केली.शासनाला लाडक्या बहिणीशी काहीही देणे-घेणे नाही भाजपा सरकारने सर्वच समाजाला नवीन महामंडळ दिली.अगोदरच अनेक महामंडळ बंद केली मात्र ही नवीन महामंडळ कशासाठी स्थापन केली ? शासन आर्थिक तोट्यात असताना केवळ विविध जाती धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी ही प्रत्येक समाजासाठी नवीन महामंडळ स्थापन करण्यात आली. मराठा ओबीसी समाजात भांडण लावून समाजात फूट पाडले.नको ते आश्वासन देऊन जनतेची समाजाचे दिशाभूल केली. मराठा ओबीसी समाज एकमेकाविरोधात उभे केले. त्यामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झाले. नोकर भरती न झाल्याने बेरोजगारी वाढली.रोजगार नसल्याने,नोकरी नसल्याने बेरोजगार तरुणांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे . मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते ते आश्वासन पूर्ण केले नाही उलट राज्यात वीज दरवाढीचे प्रयत्न सुरू आहेत जाती धर्मात भांडणे लावले त्यामुळे अशा जनतेची फसवणूक करणारा पक्षापासून सावध रहा असा सल्ला मार्गदर्शन प्रसंगी नेते भास्कर जाधव यांनी दिला.तसेच मी शिंदे गटाप्रमाणे सुरतला गेलो किंवा गुवाहाटीला गेलो तर राजकारणातुन निवृत्ती होईन.माझ्या विरोधात वेगवेगळे कट कारस्थान रचले जात आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.खोट्या पुरावाच्या आधारे जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मी शिवसैनिक असल्याने खंबीर आहे.आयुष्यात कोणतेही चुकीचे काम केले नसल्याने मी अशा गोष्टींना घाबरत नाही. सर्वांना विनंती करतो की मराठी माणसांने वेळीच सावध व्हा अन्यथा आपले अस्तित्व संपण्यास वेळ लागणार नाही असे आवाहनही भास्कर जाधव यांनी केले.यावेळी भास्कर जाधव यांनी नवी मुंबई विमानतळ, मराठी भाषा, हिंदी भाषा सक्ती आदी विविध विषयावर मार्गदर्शन केले.