मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते. त्रिभाषा सूत्र कुठल्या वर्गापासून लागू करावं, यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. तसंच, या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करू, असंही फडणवीस म्हणाले. “आमच्यासाठी मराठी महत्त्वाची आहे. आमची नीती मराठीकेंद्रित असून, यात राजकारण करायचं नाही,” असंही फडणवीस म्हणाले.
डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या विषयावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही यावर सांगोपांग चर्चा केली. तसेच असा निर्णय केला की, त्रिभाषा सूत्रासंदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशाप्रकारे करावी, कुठली भाषा करावी, मुलांना काय निवड द्यावी याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक समिती तयार करण्यात येईल.”
“या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येईल. म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी समिती त्रिभाषा सूत्रासंदर्भात सर्व गोष्टींचा अभ्यास करेल,” अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पाच तारखेला मोर्चा किंवा सभा होणारच – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, “मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे. अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती, त्याहीवेळी सगळीजण पक्षभेद विसरून एकत्र झाले. त्याहीवेळी आम्ही हा डाव उधळून टाकला होता आणि याहीवेळी हा डाव उधळून टाकला.
सरकारने मराठी माणसांमध्ये विभागणी करून अमराठी मतं स्वतःकडे ओढण्याचा छुपा अजेंडा राबवला. पण मराठी भाषिकांनी समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला नाही सक्तीला विरोध आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी अशी फूट पडली नाही. सरकारला वाटत होतं की ही फूट त्यांना लाभदायक ठरेल. आज हे आंदोलन केल्यानंतर आता पाच तारखेचा मोर्चा होऊ नये आणि मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द केला आहे.
भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झाली आहे, अफवांची फॅक्टरी झाली आहे. खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा धंदा झाला आहे. मराठी माणसाने याला चोख उत्तर दिलेलं आहे. मराठी माणसाला माझा आग्रह आहे की एकत्र येण्यासाठी संकट येण्याची वाट कशाला बघायची? पाच तारखेला आम्ही सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण आता आम्ही जल्लोष किंवा विजयी सभा घेणार आणि त्याचं स्वरूप ठरवणार आहोत. या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना आवाहन करतो की पाच तारखेला नेमकं काय करायचं हे सगळ्यांनी मिळून ठरवावं. त्या समितीला तसा अर्थ नाही, कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे सिद्ध झालं आहे. कुणाचीही समिती नेमली तरी सक्ती होऊ देणार नाही. पाच तारखेला सभा किंवा मोर्चा होणारच. मराठी माणसांनो आता झोपू नका, एकत्र आलो आहोत एकत्रच पुढे जाऊ.”