सातारा : सातारा जिल्ह्यातील खेड (ता. कोरेगाव) येथील विकास सुदामराव कदम (कला शाखेचा पदवीधर) व अभिजित समीर शिंदे (डी.फार्म) हे दोघे युवक एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांच्या घरची पार्श्वभूमी शेतीचीच आहे. शिक्षण झाल्यानंतर शेतीसोबत पूरक काहीतरी करणे त्यांना गरजेचे वाटत होते. मधनिर्मिती त्यांच्या पाहण्यात आली. त्यांना या उद्योगाबाबत उत्सुकता निर्माण झाली. या विषयातील लेखनाची त्यांनी कात्रणे देखील काढली.
थाटला स्वतःचा उद्योग
मिरज (जि. सांगली) येथील राहुल देवल स्थलांतरित मधमाशीपालन उद्योगात कार्यरत आहेत. विकास व अभिजित यांनी त्यांच्याकडून या विषयातील रीतसर प्रशिक्षण घेतले. सन २०२२ मध्ये ५० मधपेट्यांची खरेदी त्यांच्याकडून केली. या पेट्या घेऊन देवल यांच्यासोबत ते राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांत गेले.
तेथे विविध शेतकऱ्यांच्या शेतात मधपेट्या ठेवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रशिक्षणातील लहान-मोठे बारकावे समजून घेतले. सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी आरती साबळे यांचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले.
त्यातून पंतप्रधान सूक्ष्मअन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, कोरेगाव यांच्याकडून ११ लाखांचे कर्ज मिळाले. तीन लाख ७५ हजार रुपये अनुदान मिळाले. उपलब्ध झालेल्या रकमेतून सहाशे चौरस फुटांचे शेड उभे करून मध प्रक्रिया युनिट सुरू केले.
त्यात फिलिंग मशिन, लेबल मशिन, पॅकिंग मशिन ही सुविधा तयार केली. अशा रीतीने उद्योगाला सुरवात झाली. सातत्यपूर्ण कष्ट, अंगी रूजवलेली उद्योजकवृत्ती व चिकाटी यातून आज चार वर्षांच्या अनुभवातून उद्योगात चांगला जम बसू लागला आहे.
...असा आहे आजचा उद्योग
१५० मधपेट्या. एपिस मेलिफेरा मधमाशीचे संगोपन.
कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात आदी ठिकाणी मधपेट्या ठेवल्या जातात. परराज्यांमधून मोहरी, ओवा, बनतुळस, निलगिरी, जांभूळ तर महाराष्ट्रातून सूर्यफुलाचा मध संकलित होतो. मिरज येथे यंत्राद्वारे मधाची गाळण प्रक्रिया होते. त्यातील आर्द्रता काढली जाते. जांभूळ, ओवा, तुळस तसेच विविध फुलांपासून मध निर्मिती होते. खेड येथे पॅकिंग व ब्रॅडिंग केले जाते. पॅकिंग, मधपेट्या वाहतूक व अन्य कामांच्या अनुषंगाने उद्योगात सहा कामगार. विकास हे मध संकलन, निर्मिती, पॅकिंग तर अभिजित हे मार्केटिंग, वाहतूक, उत्पादन प्रमोशन करण्याची जबाबदारी पाहतात.
बाजारपेठ, प्रमोशन कृषी प्रदर्शने, महोत्सवांमधून मधाचे ब्रॅडिंग केले जाते. सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, मंगळवेढा, लातूर येथे वितरक नेमले आहेत.
पुणे, मुंबई येथील निवासी सोसायट्यांमध्येही उत्पादनाचे प्रमोशन केले आहे. आयुर्वेदिक दुकानांमध्येही मध विक्री ठेवला आहे. मार्केटिंगगसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. ऑनलाइन ऑर्डर घेतली जाते. वेबसाइट सुरू करण्याचे कामही सुरू आहे.
या सर्व प्रयत्नांमधून मध उत्पादन व विक्रीतही वाढ होत आहे. सन २०२२ मध्ये वार्षिक ७०० किलो, २०२३ मध्ये २५०० किलो, २०२४ मध्ये ३२०० किलो तर यावर्षी जूनअखेर तीन हजार किलो उत्पादन घेतले. हवामानातील बदलांचा फटका उद्योगाला बसत असल्याने उत्पादनात चढउतार होत असतात. त्यामुळे उलाढाल व अर्थकारणात बदल होतो.
परागीभवनासाठी शेतकऱ्यांकडून मधपेट्यांसाठी मागणी वाढत आहे.
दिवाळी, नवीन वर्ष भेट म्हणून स्वतंत्र आकर्षक पॅकिंग केले आहे. सणासुदीच्या तोंडावर कंपन्यांकडून चांगली मागणी राहते.
‘अमृत हनी’च्या स्टॉलला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राजकारण क्षेत्रातील अन्य मान्यवरांमध्ये चित्रा वाघ, रोहित पवार, भीमराव तपकीर यांनी भेट देऊन कौतुक केले आहे. दोघा मित्रांना उद्योगात आपापल्या कुटुंबातील सदस्यांची मोठी मदत व पाठबळ आहे. येत्या काळात पेट्यांची संख्या व मध उत्पादन वाढवून उद्योग विस्ताराचा प्रयत्न सुरू आहे.
विकास कदम ९९६००८०४५४
अभिजित शिंदे ९२७०१७१००२