अहमदनगर
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या तळमजल्यावरील गाळ्यात गेल्या चाळीस वर्षापासून पोस्ट ऑफिस खाली करण्यासाठी शिक्षक बँकेने त्यांना यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन सदरची जागा रिक्त करण्याची वारंवार विनंती केली. तरीही पोस्टाचे अधिकारी दाद देत नाहीत म्हणून आज शिक्षक बँकेच्या वतीने पोस्ट ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिक्षक नेते श्री बापूसाहेब तांबे व बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोस्ट ऑफिसचे सीनियर सुप्रीटेंडंट श्री संदीप हादगल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांनी आता शिक्षक सभासदांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. दोन महिन्यात जर पोस्ट ऑफिसने जागा खाली केली नाही तर शिक्षक बँक सभासद व कार्यकर्त्यांच्या वतीने कोणती पूर्व सूचना न देता आंदोलन करून पोस्ट ऑफिस बंद करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर असेल. बँकेच्या पूर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची व सहानुभूतीची भूमिका घेऊन पोस्ट ऑफिसला काही वर्षांच्या अटीवर जागा दिली होती. परंतु गेल्या 30 वर्षापासून पोस्ट ऑफिस एक रुपये भाड न देता सुरू आहे व बँकेच्या विनंतीची व निवेदनाची दखल घेत नाहीत. 1983 पासून पोस्ट ऑफिस ने शिक्षक बँकेशी कोणताही करारनामा केलेला नाही .सदरची जागा शिक्षक बँकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून नगर मुख्यालयातील शाखा तळमजल्यावर आणल्यास ज्येष्ठ, वयोवृद्ध नागरिक तसेच दिव्यांग खातेदार व ठेवीदारांना सोयीचे होणार आहे. तसेच मुख्यालय इमारतीत चार मजले असून चढउतारासाठी लिफ्टची सोय करण्यात पोस्ट ऑफिसमुळे अडचण येत असल्यामुळे लिफ्टची सुविधा सुरू करता येत नाही. आमची जागा लवकर खाली करा, असे बापूसाहेब तांबे यांनी यावेळी सांगितले
यावेळी पोस्ट ऑफिसचे सीनियर सुप्रीटेंडंट श्री संदीप हादगल यांनी लवकरच पोस्ट ऑफिस दुसरी जागा शोधून, शिक्षक बँकेची जागा आम्ही खाली करू, असे आश्वासन दिले शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, विठ्ठलराव फुंदे माजी चेअरमन साहेबराव अनाप, संतोष दुसूंगे,अर्जुन शिरसाट, बँकेचे संचालक बाळासाहेब तापकीर, बाळासाहेब सरोदे, सूर्यकांत काळे ,ज्ञानेश्वर शिरसाट,रमेश गोरे, कल्याण लवांडे ,बाळासाहेब कापसे, राजेंद्र निमसे, विजय ठाणगे, विजय नरवडे, सुयोग पवार, डी.एम.शिंदे, शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपराव मुरदारे, गणेश गायकवाड, प्रदीप दळवी, संजय वाघ, जितु रहाटे आधी पदाधिकारी उपस्थित होते.