केशव गौड याचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी-निलेश वैकर
नगर – येथील नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग.ज.चितांबर विद्या मंदिरचा विद्यार्थी केशव शैलेंद्र गौड (इ.10 अ) याने टाटा समुहातर्फे आयोजित ‘टाटा बिल्डिंग इंडिया 2020-21’ या निबंध स्पर्धेत मराठी कनिष्ठ विभागात विजेतेपद संपादन केले. त्याचा देशाच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थिती राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल विद्यालयाच्यावतीने केशव गौड याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव निलेश वैकर, प्राचार्या विभावरी रोकडे आदिंसह महर्षी ग.ज.चितांबर विद्यालय व शारदा मंदिरचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
याप्रसंगी सचिव निलेश वैकर म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहेत. शिक्षकांंच्या सहकार्याने शालेय अभ्यासबरोबर इतरही उपक्रम राबविले जात आहेत. चि.केशव गौड याने मिळविलेल्या यशातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी प्राचार्या विभावरी रोकडे म्हणाल्या, टाटा समुहाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धीक क्षमतेचा विकास व्हावा, लेखन कौशल्य वाढीस लागावे, अभिव्यक्त व्हावे, यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत केशव गौड याने मिळविलेले यश सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
या स्पर्धेसाठी सौ.मंजुषा जोशी, प्रशांत वि.कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक दशरथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी केशव गौड यानेही शिक्षक, आई-वडिल यांचे मार्गदर्शनाने आपणास हे यश मिळाले आहे. यापुढेही अशाच स्पर्धेत सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला. विजय कुलकर्णी यांनी या स्पर्धेविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले तर आभार गणेश उघडे यांनी मानले.