अहमदनगर – नगर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मलेरियाचा रुग्ण आढळून आला नसला तरी मलेरियाकडे दुर्लक्ष होता कामा नये. डेंग्यु सारखे किटकजन्य आजार अनेक आहेत. साथ येते त्यावेळी समर्थपणे तोंड देत डास निर्माण होणार नाही, प्रतिबंधात्मक उपाय योजना लोकवस्तीत जावून कर्मचार्यांनी राबवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी केले.
जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृतीपर मोहिम येथील जिल्हा हिवताप कार्यालयात राबविण्यात आली. या कार्यक्रमात डॉ.सांगळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अविनाश अहिरे, कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ.राजेंद्र खंडागळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.मोहन शिंदे, ट्रेनिंग सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद काकडे, नर्सिंग ट्रेनिंगच्या डॉ.श्रीमती आढाव, साथरोग तज्ञ डॉ.कोकरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या जिल्ह्यात हिवताप कर्मचारी संघटीतपणे हिवताप, डेंग्यू, मलेरिया सारख्या किटकजन्य आजारापासून लोकांना जागृत करीत असल्याने आज जिल्ह्यातील या आजाराचे प्रमाण घटले आहे, असे सांगून डॉ.सांगळे यांनी कर्मचार्यांना धन्यवाद दिले.
अध्यक्षीय भाषणात सिव्हील सर्जन डॉ.घोगरे म्हणाले, कर्मचारी, अधिकारी, आरोग्य विभाग कार्यरत असूनही किटकजन्य आजार लोकांना होतात, पण असे आजार बरे करण्यावरही भर देण्याची गरज असून, आपलं काम जर दर्जेदार असल्याने आजारी रुग्णांची संख्या घटली आहे. तरी आपण दक्ष राहून आपलं समाजात निरोगी जीवन लोकांना उपभोगता यावे, यासाठी योगदान देऊ.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रविंद्र कानडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. ते म्हणाले, गतवर्षी जिल्ह्यात मलेरियाचे पाच रुग्ण होते, मात्र यंदा एकही रुग्ण आढळला नाही. आजार होवू नये म्हणून जे प्रतिबंधात्मक उपाययोजना, गप्पी मासे पाण्याच्या डबक्यात सोडणे, जे साहित्य उपयोगी नाही ते नष्ट करणे, परिसर स्वच्छ छेवणे, पाणी साचू न देणे, व्हेंट पाईपला जाळी बसविणे आदि काम आणि प्रबोधन कर्मचार्यांनी सातत्याने करावे. ‘हीच खरी वेळ मलेरिया झिरो करण्याची’ या नव्या घोषणेप्रमाणे कार्यरत व्हावे, असे आवाहन केले.
नासिक विभागीय सहा.संचालक गिरिष सपकाळे, डॉ.काकडे, डॉ.शिंदे, डॉ.खंडागळे, डॉ.आहेर आदिंची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिवताप कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप यांनी केले.
प्रारंभी दिपप्रज्वलन व डास शोधाचे जनक सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला पाहुण्यांनी पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर शहराच्या प्रमुख मार्गावरुन जिल्ह्यातील कर्मचार्यांनी रॅली काढून समाज प्रबोधन केले. ‘गप्पी मासे पाळा – हिवताप टाळा’, ‘कणकण तापाची करा तपासणी रक्ताची’ आदि घोषणा फलक रॅलीत होते. हिवताप कार्यालयाच्या परिसरात विविध पोस्टर लावून हिवताप, डेग्यु, चिकणगुण्या बचावापासून करावयाच्या उपाययोजना याबद्दल पोस्टरवर सविस्तर माहिती प्रकाशित करण्यात आली होती. हिवताप उपचारार्थ महत्वाच्या सूचना आदिंचाही त्यात समावेश होता. जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ.सावंत यांनी शेवटी आभार मानले. किसन भिंगारदिवे, सावंत, आडेप, रामदास रासकर, अमित क्षीरसागर आदिंनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.