पोहेगांव( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी सावळीविहीर शिवेलगत गेल्या तीन महिन्यापासून बिबट्याचा हैदोस सुरू असून या बिबट्याच्या धास्तीने नागरिक भयभीत झाले आहे. पाळीव प्राण्यांची शिकार केल्यानंतर देखील वन विभागाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. वन विभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी प्रगतशील शेतकरी मोहन गिरमे यांनी केली आहे.
काल सोनेवाडी परिसरात या बिबट्याने आपला मोर्चा थेट गावातच वळवला कैलास विठ्ठल गुडघे यांच्या गोठ्यातील एक शेळी या बिबट्याने फस्त केली.तर बोंडखळ वस्ती ,जायपत्रे वस्ती, गिरमे वस्ती , फटांगरे वस्ती, राऊत वस्ती आदी परिसरात शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात हा बिबट्या दबा धरून बसतो. सध्या शेतकऱ्यांचे ऊस हांदून झाले असून उसामध्ये रानडुक्कर व प्राण्यांची संख्या वाढली आहे. या प्राण्यांची शिकार करण्यासाठी हा बिबट्या या ऊस शेतीची ही मोठी नुकसान करत आहे शेळ्या मेंढ्या कुत्रे कोंबड्या व रानडुकरांचा कर्दनकाळ म्हणून या बिबट्याने आपली दहशत केली. वेळोवेळी ग्रामस्थांनी वन विभागाकडे या बिबट्यांना जेर बंद करण्यासाठी मागणी केली असता वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष झाले. या बिबट्याच्या धास्तीने सोनेवाडी शिवारातील व्यावसायिक आपले दुकाने सातच्या आत बंद करून घरी येतात त्यामुळे व्यवसायातही नुकसान होत असल्याचे गोरख लिपने यांनी सांगितले.वन विभागाने आता याकडे दुर्लक्ष न करता तातडीने सोनेवाडी सावळिविहीर शिवालगत या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी मोहन गिरमे यांनी केली आहे.