सातारा/अनिल वीर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चि. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ४६ व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. येथील डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते रमेश इंजे,विलासराव कांबळे, जे.डी. कांबळे आदींनी मार्गदर्शन केले.सदरच्या कार्याक्रमास सर्व क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी,उपासक-उपासिका उपस्थित होत्या.
महाविहार येथे दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) कराड तालुक्याच्यावतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन माजी तहसीलदार राजाराम पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेचे माजी राष्ट्रीय सचिव व्ही. आर. थोरवडे,सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष सांगली लोखंडे, नंदकुमार भोळे,समता सैनिक दलाचे संजीवन लादे,यशवंत अडसुळे (आप्पा), कराड तालुका ॲट्रॉसिटी ॲक्ट समितीचे सदस्य विकास मस्के, राहुल थोरवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.यशवंत (आप्पा) अडसुळे यांनी सूत्रसंचालन केले.व्ही.आर. थोरवडे म्हणाले, “बाबासाहेबांच्या निधनानंतर भैय्यासाहेब यांनी संस्थेची जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे निभावून संस्थेचा नावलौकिक संपूर्ण भारतामध्ये वाढविला.त्यामुळेच खऱ्या अर्थाने धम्म प्रचार-प्रसार होत आहे.याचे श्रेयही भैय्यासाहेबांनाच जाते.” राजाराम पाटणकर यांनीही मनोगतात संस्थेच्यावतीने चालू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले.सदरच्या कार्यक्रमास बहुसंख्य महिला, उपासक,उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.सचिन आढाव यांनी आभार मानले. सरनेतेय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.