भारतीय निवडणूक आयोगाकडून जाहीर
नाशिक, दि. 14 मे, 2024 (विमाका वृत्तसेवा):
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण व मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागांकरिता भारतीय निवडणूक आयोगाने दि. 8 मे 2024 रोजी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, असे निवेदन आयोगाकडे प्राप्त झाले होते.
या निवेदनाचा विचार करून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सदर निवडणूकीची तारीख ही शिक्षकांसाठी अडचणी ठरत असल्याची तक्रार नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली होती. त्याची प्रशासनाने दखल घेत निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. त्याबद्दल प्रशासनाचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघांचे सचिव एस बी देशमुख यांनी व्यक्त केली.