पशुखाद्य प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा  – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0

शिर्डी, दि.१५ – पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा पथदर्शी प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पशुसंवर्धन विभाग आणि राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या‌वतीने लोणी खुर्द येथे २ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीतून‌ उभारण्यात येणाऱ्या पशुखाद्य प्रकल्पाचे भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील,  माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डाॅ.सुनिल तुंबारे, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यात ५३ लाख लीटर दूध उत्पादन होत‌ असून दूध संघापेक्षा वैयक्तिक दूध संकलक‌ जास्त प्रमाणात दूध खरेदी करतात. साॅर्टेड सिमेन्स वापरण्याचे वाढते प्रमाण पाहाता येणाऱ्या काळात पशुधन वाढणार आहे.  पशुधनाकरिता लागणारे पशुखाद्य तेवढेच दर्जेदार आणि गुणवतापूर्ण असले पाहिजे. पशुखाद्य कंपन्यांच्या बॅगवर खतामध्ये असलेल्या घटकांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक केल्याने त्याचा चांगला परिणाम झाला आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शेती उत्पादित माल आणि फुलांसाठी कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येणार असून याचा लाभ तालुक्यातील फुल उत्पादक  शेतकऱ्यांना होईल. सोयाबीन खरेदीचे चांगले नियोजन झाल्यामुळे तालुक्यातील ५९६ शेतकऱ्यांना ५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. खरेदीची मुदत वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला केलेली विनंती मान्य झाल्यामुळेच खरेदी होवू शकली, असेही त्यांनी सांगितले. अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here