बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या… शेतकरी सेना जिल्हाप्रमुख होन
कोपरगाव (प्रतिनिधी ) : कोपरगाव तालुक्याला वरदान ठरलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या हॅरिसन ब्रँच चारीने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या चारीच्या लाभक्षेत्रातील सोनेवाडी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरातील शेतकरी एकेकाळी समृद्ध होता. त्यामुळेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या परिसराला कॅलिफोर्निया म्हणून संबोधले असल्याचे सांगितले जाते. मात्र २०११/१२ या वर्षापासून या चारीला घरघर लागली असून पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक या शेतकऱ्यांचे वाटोळे करत असल्याचा आरोप शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख भगीरथ होन यांनी केला आहे.

पाटबंधारे विभागाने या चारीचे वाटोळे केले असून हॅरिसन ब्रँच चारी लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना नाशिक पाटबंधारे विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होन यांनी केली आहे.गोदावरी उजव्या कालव्याला आवर्तन सुटल्यानंतर पाणी राहता तालुक्यातील चितळी परिसरात टेलला गेल्यानंतर लगेच सुरुवातीला हॅरिसन ब्रँच चारी सुटली जायची. या चारीच्या लाभ क्षेत्रात हजारो एकर बागायती क्षेत्र होते. मात्र सन 2005 च्या समन्वयी पाणी वाटप कायद्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाने पूर्वीच्याही आवर्तन सोडण्याच्या निर्णयात बदल केला आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.अनेक वेळा परिसरातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उपोषण केले आहे. गोदावरी उजव्या कॅनलला आवर्तन सुटल्यानंतर किमान आठ ते दहा दिवसात ही सारी सुटायला हवी असते मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून असे घडत नाही.

पाटबंधारे विभागाच्या राहाता येथील अधिकाऱ्यांशी या संदर्भात अनेक वेळा संपर्क केला असता त्यांनीही यासंदर्भात उडवा उडवी करत ये रे माझ्या मागल्या असेच काही केले आहे.या चारीच्या संदर्भात राजकारण होते का असाही प्रश्न उपस्थित होतो. मात्र राजकारणी मंडळी ही ही चारी वेळेस सोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अनेक वेळा दिसून आले. मात्र तरीही पाटबंधारे विभाग कडून दखल का घेतली जात नाही. हा मोठा यक्षप्रश्न आहे.आता या परिसरातील शेतीचे पूर्ण वाटोळे झाले असून गेल्या आठवड्यातच शेतकऱ्यांना आपल्या शेतात लावलेल्या कांदा गहू व ऊस भाजीपाला फळबागांना पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र अजून देखील पाण्याची प्रतीक्षा असल्याने आता या परिसरातील या पिकांचे नुकसान होत आहे.गेल्या पंधरा वर्षापासून हा अन्याय या परिसरातील शेतकरी सहन करत असून अधिकारी व सरकारकडून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने आता परिसरातील शेतकऱ्यांना बरोबर घेत पंधरा वर्षापासून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठीच आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे शिवसेना शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख भगीरथ होन यांनी सांगितले आहे.