राजकीय नेत्यांच्या पडद्यामागील हालचाली वाढल्या,बिनविरोधची आशा धुसर

0

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मंडळांचे प्रमुख एकञ येण्यास तयार नाही. बिनविरोधसाठी माघार घ्यायची कोणी?

कारखाना निवडणूक वार्तापत्र  राजेंद्र उंडे  देवळाली प्रवरा  : राहुरी परिसरासाठी कामधेनू ठरलेल्या तनपुरे कारखान्याचे भवितव्य ठरविण्यासाठी निर्णायक असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.१७३ इच्छूक उमेदवारीच्या तयारीत आहेत. माघारीची १६ तारीख अंतिम आहे.माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम वगळता अद्याप एकानेही माघार घेतलेली नाही.त्यामुळे बिनविरोधची आशा धूसर दिसत असतानाच, दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या पडद्यामागील हालचाली वाढल्या आहे. त्यामुळे माघारीनंतर दुरंगी की तिरंगी लढत रंगणार,याकडे लक्ष असणार आहे.

       राहुरी येथील तनपुरे कारखान्याची निवडणूक जाहिर होताच विधानसभेपासून थंडावलेले राजकीय धुराडे पुन्हा पेटले. २१ संचालक पदासाठी तब्बल १८० जणांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी १७३ अर्ज वैध घोषित करत निवडणूक प्रशासनाने आठवड्यापासून माघारीची संधी दिली. आठवडा उलटत असतानाही एकही इच्छुकाने माघारीचा निर्णय घेतलेला नाही. अर्ज माघारीसाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने घडामोडी वाढल्या आहेत.एकाही इच्छूक उमेदवाराने अर्ज माघारीचा निर्णय न घेतल्याने सर्वांचे लक्ष १६ मे रोजी माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे लागलेले आहे.बिनविरोध निवडणूक करा यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे.

             डाँ.तनपुरे कारखान्यासाठी भाजपकडून आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनात विखे कर्डिले गटासह भाजप मित्र पक्षांची जुळवाजुळव सुरू असताना भाजपाचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी निवडणूकीतून माघार घेवून बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे तनपुरे गटाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे मैदानात उतरलेले आहे. तनपुरे यांनी बाजार समितीमध्ये आदर्शवत कार्य करीत सहकारात नावलौकिक मिळविलेला आहे.तनपुरे कारखान्यालाही गतवैभव मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्या बाजार समितीच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू करण्याचा मनसुबा आखत रणशिंग फुकले आहे.संभाजी प्रतिष्ठाणचे राजूभाऊ शेटे यांनीही निवडणुकीत दमदार उमेदवार देण्यासाठी बांधणी केली आहे.तर कारखाना बचाव कृती समितीने गटा-गटात बैठका सुरू करीत कारखाना सुरू करण्याबाबत सभासद,कामगारांपुढे आपली आगामी व्यूहरचना मांडण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, सोशल मीडियामध्ये मागिल सत्ता काळामध्ये झालेल्या कामकाजाची माहिती देत तनपुरे कारखान्याला झालेल्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान मांडले जात आहे.तर कारखाना आमचाच नेता कसा सुरू करणार हे दाखविण्यासाठी कार्यकत्यांनी सोशल मीडियामध्ये जीवाची बाजी लावण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये कार्यकर्त्यांची पेटलेली राजकीय धुळवड आगामी काळात राहुरीच्या राजकारणाचे धुराडे पेटवायला महत्वाचे ठरणार आहे. तनपुरे कारखान्याच्या सभासदांची यादी घेऊन इच्छूक उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत.

चौकट

सात गटातून २१ संचालक निवडले जाणार!

      कोल्हार गटामध्ये २५ गावे असून ३ हजार १७२ सभासद आहेत.देवळाली प्रवरा गटामध्ये १२ गावे असून ३ हजार ४१७ सभासद संख्या आहे. टाकळीमिया गटामध्ये १५ गावे असून ३ हजार ५९२ सभासद आहे. आरडगाव गटामध्ये ११ गावे असून ३ हजार ७२५ सभासद आहेत. वांबोरी गटामध्ये १७ गावे समाविष्ट असून ३ हजार ४४८ सभासद आहे. राहुरी गटामध्ये १२ गावे असून ३ हजार ७३९ सभासद असून कारखान्याच्या निवडणुकीत एकूण ९२ गावांतून २१ हजार ९३ इतकी सभासद संख्या आहे. तर व वर्ग गटामध्ये सेवा संस्था प्रतिनिधी १९० आहेत.

चौकट

        सुमारे ३० लाखांची रक्कम जमा!

                 तनपुरे कारखाना निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छूक उमेदवारांना सभासद शेअर्स रक्कम भरणे महत्वाचे होते. मोठ्या प्रमाणात इच्छूक असल्याने सभासद शेअर्स रक्कम मोठ्या प्रमाणात जमा झाली. सुमारे ३० लाखाची रक्कम जमा होऊन त्याचा लाभ कारखाना कामगारांना होईल, अशी अपेक्षा लागलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here