देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
नगर तालुक्यातील ७ ते ८ तरुण दि. १८ मे रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले असता भगवान घाडगे हा तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुदैवी अंत झाल्याची घटना उघडकीस आली.
नगर तालुक्यातील एमआयडिसी परिसरातील सुमारे ७ ते ८ तरुण दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी ते तरुण पोहण्यासाठी धरणातील पाण्यात उतरले. भगवान रुस्तम घाडगे, वय ३५ वर्षे, रा. नागापूर, रेणुका माता मंदिर परिसर हा तरुण पाण्यात पोहत असताना तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या मित्रांनी आरडा ओरडा केला. मात्र काही क्षणातच भगवान घाडगे हा पाण्यात दिसेनासा झाला.
काल दिवसभर काही तरुणांनी धरणाच्या पाण्यात त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. आज दि. २० मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुळा धरणाच्या मत्स उद्योग केज परिसरात भगवान घाडगे याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्याला पाण्याच्या बाहेर काढून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित कले.
त्यानंतर भगवान घाडगे याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भगवान घाडगे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन, मुली, भाऊ असा परिवार आहे. तो नगर एमआयडीसी मधील कंपनीमध्ये काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या मित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.