मुंबई : ठाण्यामध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात 56 रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. ठाण्यातील मृत तरुण हा 21 वर्षांचा होता. गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे त्याला गुरुवारी (22 मे) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
शुक्रवारी (23 मे) रात्री त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आज (24 मे) सकाळी त्याचं निधन झालं, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. ठाणे महानगरपालिकेतील माहिती व जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज एकूण 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ठाण्यातील एकूण रुग्णसंख्या 19 वर गेली आहे. तर एकूण महाराष्ट्रात सध्या 56 सक्रिय रुग्ण आहेत.
‘घाबरण्याचं कारण नाही, पण सतर्कता महत्त्वाची’
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय, “सध्या मुंबईला कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. कालही ठाण्यामध्ये तीन अँटीजन पॉझिटीव्ह आले आहेत. कन्फर्म नाहीये. पण आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे, त्यानुसार, या माईल्ड केसेस आहेत.”
“हा ओमिक्रॉनचाच सब-व्हेरियंट आहे. पण यामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये. हा साधा व्हायरस आहे. पण, पावसाळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता महत्त्वाची आहे. महासाथ संपुष्टात आली आहे. आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय झालेली आहे. फक्त सतर्कता बाळगणं गरजेचं आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.