येवला,प्रतिनिधी :
प्रोटीन मालावर ९ कोटींच्या शुल्क चोरीप्रकरणी व्यावसायिक अटकेत
मुंबई/येवला प्रतिनिधी : महासंचालक महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) सॅम्राट विक्रम वर्मा या कॉलेजन लाईफसायन्सेस प्रा. लि. या कंपनीच्या संचालकास चीनहून उच्चमूल्य प्रोटीन उत्पादने चुकीच्या प्रकारे जाहीर करून ९ कोटी रुपयांचा आयात शुल्क चोरीप्रकरणी अटक केली आहे. डीआरआयने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला की कृष्णा एन्झायटेक प्रा. लि. व कॉलेजन लाईफसायन्सेस प्रा. लि. या दोन कंपन्यांनी महागड्या न्यूट्रिशन प्रोडक्ट्स — पी प्रोटीन व कोलेजन पेप्टाइड्स — यांना कमी शुल्काच्या ग्लायसिन या मालासारखे जाहीर करून शुल्क चोरी केली. या कंपन्या महाराष्ट्रातील येवला येथील उत्पादन केंद्रावरून काम करतात.
सम्राट वर्मा यांना सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांचे वकील अब्द पोंडा यांनी वर्मा यांनी निर्दोष असल्याचा दावा करत २ कोटी रुपये आधीच भरले असून, आणखी ७ कोटी रुपये भरण्याची तयारी असल्याचे सांगितले व जामिनासाठी ही रक्कम अटीवर स्वीकारावी, अशी मागणी केली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५४ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा चुकीच्या प्रकारे जाहीर केलेला माल असून, ९ कोटी रुपयांचा शुल्क अपहार झाला आहे. प्रकरणात पुरावे नष्ट होण्याचा धोका असल्याने आणि संपूर्ण फसवणुकीचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.