मच्छीमारांनो, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा :  महेंद्र घरत

0

उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )“पूर्वीसारखी आता मासेमारी राहिलेली नाही. काळ झपाट्याने बदलतोय, तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे मासेमारी करताना मच्छीमारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणांनी, नव युवकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मत्स्य व्यवसायात उतरायला हवे. विकासाच्या नावाखाली समुद्राला हटवण्याचे प्रकार सुरू आहेत, पण निसर्गाच्या नादी कुणी लागू नये. जेवढा तुम्ही समुद्रात भराव कराल, त्यापेक्षा दुप्पट वेगाने समुद्रही आपल्याला एकना एक दिवस गिळल्याशिवाय राहणार नाही. अनेक ठिकाणी खाडीकिनारे बुजवल्याने स्थानिक मच्छीमारांवर उपाशीपोटी राहाण्याची वेळ आली आहे. गणेशपुरीसारखे गाव समुद्रकिनारी होते, आता त्यांचे स्थलांतर काँक्रिटच्या जंगलात केले आहे. त्यामुळे त्यांना मासेमारी करण्यासाठी जाताना होणारा मनस्ताप वातानुकूलित दालनात बसून प्लॅनिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना कळणार कसा, असा सवाल महेद्र घरत यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, कोळी समाज एकत्र व्हायला हवा, नवीन जेट्टीसाठी प्रयत्न करू, चालत राहा, एकमेकांचे सहकार्य घ्या, गणेशपुरी ग्रामस्थांना मी त्या त्या वेळी सिडकोसोबत लढल्यानेच घरांचे प्लाट मिळाले आहेत. यापुढेही मी गणेशपुरी ग्रामस्थांच्या मागे खंबीरपणे उभा आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले. गुरुवारी (ता. १०) त्यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचे उलवे नोडमध्ये उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

“पालघर, सातपाटी येथील मच्छीमार सोसायट्या खूप चांगल्याप्रकारे काम करीत आहेत. त्यांचे कामकाज पाहाण्यासाठी अभ्यास दौरे काढा,  मासेमारी हा व्यवसाय करताना त्याचाही अभ्यास करा, आता प्रचंड स्पर्धा आहे. मच्छीमार महिलांसाठी अनेक योजना आहेत. कोकणी माणूस मत्स्य कार्यालयात यायला कंटाळा करतो, आपण पत निर्माण करा आणि शासकीय योजनांचा फायदा घ्या, समुद्राप्रती आदर, प्रेम हवेच,” असे अलिबागचे मत्स्य आयुक्त संजय पाटील यावेळी म्हणाले.

“महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच विठ्ठल-रखुमाई ही सहकारी संस्था सुरू  झाली, गुरुपौर्णिमेनिमित्त हीच त्यांना भेट मी समजतो. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात सिडकोविरुद्ध लढू,” असे महाराष्ट्र फिशरमन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मार्तंड नाखवा म्हणाले. यावेळी मत्स्य परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे, विठ्ठल-रखुमाई मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष परशुराम डोलकर, साई संस्थान वहाळचे रविशेठ पाटील, राजेंद्र पाटील, विजय शिरढोणकर, माजी सरपंच सुजित मोकल, रुपेश मोहिते,  सुगंधा कोळी, नयना कोळी, जोमा कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here