उरण दि ४(विठ्ठल ममताबादे ) : सिडको भवन येथील प्रवेशद्वारावर २८ एप्रिल पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.नुकतीच भूमी व भूमापन अधिकारी (ठाणे- रायगड)यांचे दालनात पक्षाच्या शिष्टमंडळासोबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी १२.५% भूखंड वाटपाची सोडत ११ जून २०२५ रोजी झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी काही सिडको प्रकल्पग्रस्तांना द्रोणागिरी नोड मधील भूखंडांचे इरादा पत्र दिल्याचे भूमी व भूमापन अधिकारी संदिप निचित यांनी सांगितले.हे भूखंड द्रोणागिरी सेक्टर ६५ मध्ये देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खरे तर हे भूखंड विकसित नाहीत हे प्रत्यक्ष पहाणी केल्या नंतर लक्षात आले आहे. या जागेवर ३१९ प्लॉट वितरीत केले असून त्याचे क्षेत्रफळ २ लाख चौरस मिटर आहे. मात्र ही जमीन टेबल प्लॉट नसून तेथे रस्ते ,गटारे,वीज वितरण, पाणीपुरवठा या कोणत्याही मुलभूत सुविधा उपलब्ध नसलेली जमीन आहे असे कॉम्रेड भूषण पाटील यांनी मांडले.
द्रोणागिरी नोड साठी २००७ व २०१५ साली भूखंड वितरणाच्या लॉटरी होऊन व इरादा पत्र देऊन सुद्धा त्या प्रकल्पग्रस्तांना भूखंडच मिळाले नसल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले व संताप व्यक्त केला.एवढेच नव्हे तर चाणजे हद्दीतील जमीनींचे संपादन झालेले नसताना गुंतवणूकदारांनी केलेल्या व्यवहारातील जमीनीच्या फाइल सिडकोने जमा करुन घेतल्या व गुंतवणूकदारांना २२.५% प्लॉट उलवा नोड मध्ये दिले आहेत.याचा अर्थ प्रकल्पग्रस्त उपाशी गुंतवणूकदार तुपाशी ही व्यवस्था सिडकोने निर्माण केली आहे.तेव्हा जोपर्यंत विकसीत भूखंड मिळे पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहील.असे यावेळी ठामपणे सांगण्यात आले.विकसित भूखंड द्या अन्यथा बेमुदत आंदोलन सुरूच रहाणार अशी आक्रमक भूमिका कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे यांनी घेतली आहे.या शिष्टमंडळात हेमलता पाटील,संजय ठाकूर, भास्कर पाटील सहभागी झाले होते.