देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी फँक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना कामगार वसाहतीचा पाणी पुरवठा काही दिवसापुर्वी खंडीत केला गेला होता.त्या पाठोपाठ शुक्रवार सायंकाळ पासुन विद्युत पुरवठा महावितरणाने खंडीत केला आहे. गेल्या काही दिवसा पासुन 41 डिग्री तापमानाची नोंद झालेली असुन याउष्णतेमुळे येथिल नागरीकांची लाहीलाही होत असुन कुटुंबातील प्रत्येक जण झाडाच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहे.
डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडे कामगार वसाहतीचे वीज बील थकीत असुन कामगार वसाहतीचे अंदाजे 9 लाख 20 हजार रुपये वीज बील थकविले आहे.महावितरणाच्या कार्यालयाकडुन अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत करण्याचे लेखी पञव्यवहार कारखान्याकडे केलेला आहे.तरी हि वीज बील भरले गेले नसल्याने महावितरण कार्यलयाकडून शुक्रवारी विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. याबाबत महावितरण अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे. सध्या तापमानाचा पारा 41डिग्रीच्यावर पोहचला असल्यामुळे कामगार वसाहातीतील नागरिक उकड्याने हैराण झाले आहे.आजारी व्यक्तींना तर मरण यातना सहन कराव्या लागत आहे.प्रत्येक कुटुंबातील सदस्य झाडाच्या सावलीचा आधार घेत आहे.
गेल्या आठवड्यात कामगार वसाहत येथे तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा बंद होता. त्यामुळे कामगार कुटूंबियांचे हाल झाले. आता ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. तनपुरे कारखाना कामगार वसाहतीसाच्या वीज प्रश्नी खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून वसाहतीसाठी स्वतंत्र रोहित्र देण्यात आले. मात्र विखे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ जावून प्रशासनाने कारभार हातात घेतला. तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील वीज, पाणी आदी प्रश्न उपस्थित झाल्यास प्रशासक याकडे फारस गांभीर्याने बघत नसल्याने कारखाना कामगारांची त्रेधात्रिरपट उडत आहे.
वीज व पाणी जीवनातील अविभाज्य घटक असुन मध्यंतरी पाणी पुरवठा खंडीत झाला. त्यासाठी नगर मनमाड महामार्गावर अचानक रास्तारोको आंदोलन केल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत झाला.अंगाची लाहीलाही होत असताना वीज पुरवठा खंडीत केला गेल्याने नागरिक उष्णतेच्या लाटेत होरपळत आहे.