कोपरगांव : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्टूडेंट मेंटोरिंग विभागाच्या वतीने दिक्षारंभ (विद्यार्थी उद्बोधन) वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्बोधन वर्गामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासक्रमा व्यतिरिक्त महाविद्यालयात वर्षभर राबवित असलेल्या विविध उपक्रमांची/योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
ज्यामुळे विद्यार्थी वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन आपले ध्येयनिश्चिती करू शकतात. या शैक्षणिक वर्षात कला, वाणिज्य, विज्ञान, बी.सी.ए., बी.सी.एस. शाखेच्या वतीने संपन्न होत असलेल्या विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. व्ही. सी. ठाणगे, वाणिज्य शाखाप्रमुख प्रो. एस. आर. पगारे, विज्ञान शाखाप्रमुख प्रो. बी. बी. भोसले, कला शाखाप्रमुख प्रो. के. एल. गिरमकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे नमुद करतांनाच या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व ध्येयपूर्तीसाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. व्ही. सी. ठाणगे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, महाविद्यालयीन जीवनाच्या प्रवासातून चांगला व सुसंस्कारित नागरिक घडत असतो. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राबवित असलेल्या विविध उपक्रमांतून आपले ध्येय गाठले पाहिजे. यावेळी त्यांनी महाविद्यालयातुन शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान झालेल्या माजी विद्यार्थ्यांचाही गौवोद्गार केला. या सात दिवसीय विद्यार्थी उद्बोधन वर्गात स्पर्धा परीक्षा विभाग, प्लेसमेंट सेल, क्रिडा विभाग, एन.एस. एस., एन.सी.सी., विद्यार्थी विकास मंडळ, ग्रंथालय विभाग, शिष्यवृत्ती विभाग, सांस्कृतिक विभाग, वादविवाद व वाड:मय मंडळ, विद्यार्थी तक्रार निवारण विभाग इत्यादी विविध विभाग व उपक्रमांची सखोल माहिती दिली जाणार असल्याची माहिती स्टूडेंट मेंटोरिंग विभागाचे प्रमुख डॉ. आर. ए. जाधव यांनी दिली. नव-प्रवेशित विद्यार्थांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता यावी यासाठी विविध उपक्रमांची ओळख करण्याच्या दृष्टिने आयोजित या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन प्रो. एस. एल. अरगडे, डॉ. एस. बी. काळे, डॉ. एम. बी. खोसे, प्रा.एन.एस. पोटे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रथम वर्ष वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.