कोपरगांव : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, प्रसिद्ध ग्रामीण कवी व चित्रपट गीतकार विष्णु थोरे, संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मराठीचे जेष्ठ साहित्यिक, रानकवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या कार्याला उजाळा म्हणुन त्यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांना प्रदर्शनात ठेवण्यात आले. ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. निता शिंदे यांनी ग्रंथाचे महत्व विषद करतांना आपण जितके जास्त पुस्तके वाचतो तितके आपले ज्ञान वाढत जाते. वाढत्या ज्ञानामुळे जीवनात चांगले निर्णय घेण्यास आपण सक्षम बनत असतो. त्यामुळे चांगली पुस्तके ही आपली मित्र व मार्गदर्शक मानली जातात असे सांगितले. यावेळी त्यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या असंख्य पुस्तकांची माहिती दिली. या प्रदर्शनात विविध विषयांचे अनेकानेक पुस्तके, मासिके व संदर्भ ग्रंथाचा समावेश करण्यात आला होता. याव्यतिरिक्त कथा-कादंबरी, आत्मचरित्र यांच्यासह स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रदर्शनाला अतिथी अभ्यागत, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.