के.जे.सोमैया महाविद्यालयात भूगोल विभागाची अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा संपन्न कोपरगाव: महाविद्यालयात शिकविला जाणारा अभ्यासक्रम हा विद्यार्थी व शिक्षक यांना जोडणारा महत्वाचा सेतु असतो. त्यामुळे अभ्यास मंडळाच्या माध्यमातून तयार होणारा महाविद्यालयीन अभ्यासक्रम हा विद्यार्थी तसेच रोजगारकेंद्रित असणे आवश्यक आहे. असे विचार संस्थेचे विश्वस्त संदिप रोहमारे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले . के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळ व महाविद्यालयाच्या वतीने अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते या कार्यशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मुसमाडे, संस्थेचे विश्वस्त संदिप रोहमारे, प्र. प्राचार्य प्रो. (डॉ) संतोष पगारे, प्रो. (डॉ.) विजय ठाणगे, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चव्हाण व अभ्यास मंडळातील इतर सदस्याच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटनाप्रसंगी डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी नविन शैक्षणिक धोरण व भूगोल पाठ्यक्रम यांचा सह-सबंध नमूद करतानांच मानवी जीवनात भूगोलाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपण जगतो ते जग, त्याचे स्वरूप, विविध भूप्रदेश, देश, तेथील लोकजीवन यांचे ज्ञान आपल्याला भूगोलामुळेच होत असते म्हणुन इतर विषयांपेक्षा हा विषय दर्जेदार होने आवश्यक असल्याचे ही त्यांनी नमूद केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात नविन अभ्यासक्रमाविषयी विचारमंथन केले गेले. यामध्ये इतर प्राध्यापकांनी ही महत्वाचे मार्गदर्शन केले. दिवसभराच्या दोन्ही सत्रात उपस्थित तज्ञ प्राध्यापकांनी नविन शैक्षणिक धोरण डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम पूर्ततेसाठी सहकार्य केले. यावेळी भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राजेंद्र झोळेकर, डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. अनिल लांडगे, डॉ. विजय भगत यांनी उपस्थित प्राध्यापकांच्या अभ्यासक्रमाविषयी शंकेचे निरसन केले. या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित भूगोल अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रारूप तयार करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चव्हाण यांनी या कार्यशाळेचा उद्देश्य नमूद करतांनाच भूगोल विभागाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित प्रमुख मान्यवरांचा परिचय भूगोल विभागाचे प्रा.डॉ.वसुदेव साळुंके यांनी करून दिला. सुत्रसंचालन प्रा. डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. राजेंद्र पवार व प्रा. सुभाष सोनवणे यांनी केले. या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळातील सर्व सदस्य, अहमदनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व भूगोल विभागातील संशोधन करणारे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. ह्या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.जयश्री खंडीझोड, प्रा. रमेश डांगे, श्री. अमोल डांगे व विभागातील इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.