के. जे. सोमय्या महाविद्यालयात ‘ग्रंथदिंडीचे’ आयोजन

0

कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अंतर्गत के. जे. सोमय्या महाविद्यालयात विविध उपक्रमांचे दिनांक १ जाने. ते १५ जाने. यादरम्यान आयोजन करण्यात आले. त्यामध्ये निबंध लेखन, पुस्तक परीक्षण, ग्रंथ प्रदर्शन, ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा तसेच या पंधरवड्याची सांगता ‘ग्रंथ दिंडीने’ करण्यात आली. ग्रंथदिंडीसाठी  कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे हे स्वतः उपस्थित होते. “अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम असून विद्यापीठ स्तरावर हा सोहळा गौरविला जाईल व आपल्या महाविद्यालयातील विविध कलागुणांचा ठसा उमटवला जाईल”, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. सी. ठाणगे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. “वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाने अमलात आणला असून असेच नवनवीन उपक्रम ग्रंथालय विभागातून तसेच अन्य विभागातर्फेही आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत राहू” असे आपल्या मनोगतात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना म्हटले. यावेळी ग्रंथदिंडीसाठी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फुगडी खेळून व अभंगाच्या नामघोशात ग्रंथ दिंडीला प्रति पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.

ग्रंथदिंडीसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे हेही  उपस्थित होते. ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. निता शिंदे यांनी ग्रंथदिंडीच्या सांगता वेळी सर्वांचे आभार मानले व यापुढेही विद्यार्थ्यांच्या साठी आपण अनेक उपक्रम राबवत राहु,त्यासाठी आपणा सर्वांचेही सहकार्य तेव्हढेच महत्त्वाचे आहे, असे यावेळी त्या म्हणाल्या. ग्रंथदिंडीच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागातील विकास सोनवणे, गणेश पाचोरे, स्वप्निल आंबरे, रवींद्र रोहमारे, अजय पिठे, परसराम लांडगे, हजारे महेश, माळी दिनकर, कुलकर्णी नितीन या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here