दौड-रावणगाव, परशुराम निखळे :
रावणगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला दिनकर आटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शोभा गावडे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झाले होते.सरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या या सभेला सर्व सदस्य हजर होते.सरपंच पदाच्या या निवडणुकीत निर्मला आटोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र भोई यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे,ग्राम महसूल अधिकारी मिलिंद हगारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन नवनियुक्त सरपंच निर्मला आटोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
“सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करणार असल्याबाबत मत सरपंच आटोळे यांनी व्यक्त केले.” तर यावेळी बोलताना ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे-चव्हाण म्हणाल्या की,ज्या महात्मा फुलेंनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या जयंतीदिनी महिला सरपंच पदावर विराजमान होणे ही खरोखरच महात्मा फुलेंना आदरांजली आहे. आभार उत्तम आटोळे यांनी मानले.