धर्म, न्याय आणि सेवेचा दीपस्तंभ राजमाता अहिल्यादेवी होळकर- आ. आशुतोष काळे

0
त्रिशताब्दी जयंती सोहळा .jpeg

कोळपेवाडी वार्ताहर :- ज्या काळात महिलांना सामाजिक जीवनात फारसा वाव नसतांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरं बांधली, धर्मशाळा उभारल्या, गरिबांना मदत केली. त्या जनतेवर प्रेम करणाऱ्या प्रेमळ राज्यकर्त्या होत्या. त्यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एक राज्यकर्त्या नव्हत्या, तर त्या एक दूरदृष्टी संपन्न, न्यायप्रिय, आणि समाजहिताचा विचार करणाऱ्या आदर्श प्रशासक आणि जनकल्याणकारी कुशल राजकर्त्या होत्या. त्यांनी केलेलं समाजकार्य धर्म, न्याय आणि सेवेचा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे मोठ्या उत्सवात त्यांचा ३०० वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे नेतृत्व, सेवाभाव यांचे प्रतीक असून त्यांचा आदर्श आपल्याला प्रेरणा देतो. त्यांचे शासन केवळ रस्ते, घाट, धर्मशाळा व मंदिरे उभारण्यातच नव्हते, तर त्यांनी लोकहिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हे आजही आदर्श मानले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ एक महान स्त्री शासिका नव्हत्या, तर त्या एक आदर्श समाजसेविका, धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आणि न्यायप्रिय प्रशासनकर्त्या होत्या. ज्या काळात महिलांना सार्वजनिक जीवनात फारशी संधी नव्हती, अशा काळात अहिल्यादेवींनी नेतृत्व केले हेच त्यांच्या धैर्याचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक असून त्यांचे मूल्य, कार्यपद्धती आणि सेवा-भाव यांचा आदर्श समोर ठेवून नवा सामाजिक बदल घडवण्याची प्रेरणा प्रत्येक पिढीला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जयंती उत्सव समिती व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, व कोळपेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here