[ad_1]
India England Tour 2025: इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती उद्या म्हणजेच शनिवारी (23 मे) रोजी करणार आहे. टीम इंडियाच्या निवडीपूर्वी, काही वृत्तांनुसार असा दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआयची (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) निवड समिती अनुभवी 34 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या दौऱ्यातून बाहेर ठेवण्याचा विचार करत आहे. केवळ शमीच नाही तर जसप्रीत बुमराहबाबतही एक मोठी अपडेट समोर आली आहे.
नेमकी अडचण काय?
शमीला आरोग्यासंदर्भातील समस्या असल्याचं बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने निवड समितीला सांगितलं आहे. शमी अद्याप दिर्घकाळ गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत शमी संपूर्ण पाच कसोटी सामने खेळू शकेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळेच आता असं मानलं जात आहे की निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर भारतीय संघात तंदुरुस्त गोलंदाजांचा समावेश करताना शमीला डावलू शकतात. आगरकर यांना संघात असे गोलंदाज हवे आहेत जे गरज पडल्यास लांब दिर्घकाळ गोलंदाजी करु शकतात.
बुमराहने आधीच बोर्डाला सांगितलंय की…
खरं तर समोर आलेल्या वृत्तानुसार, शमीला भारतीय संघात समाविष्ट करण्याबाबत आणि काही सामन्यांमध्ये त्याला खेळवण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र जसप्रीत बुमराहने आधीच बोर्डाला आपल्या क्षमतेसंदर्भातील मर्यादांबद्दल कळवलं आहे. माझं शरीर तीनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याच्या स्थितीत नाही, असं बुमराहने बीसीसीआयला सांगितलं आहे. त्यामुळे निवड समिती अशाच अनिश्चित गोलंदाजाला संघात स्थान देणार की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. बुमराह या स्पर्धेत अगदी काहीच सामने खेळू शकेल. याचा परिणाम भारतीय संघाच्या नियोजनावरही होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवड समितीला कसली भिती?
शमी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी चार षटके टाकतोय. मात्र सध्या बोर्ड आणि निवडकर्त्यांना याची खात्री नाही की तो एका दिवसात 10 पेक्षा जास्त षटके टाकू शकेल. इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये, वेगवान गोलंदाजांनी दिर्घ काळ गोलंदाजी करण्याची आवश्यकता असू शकते आणि आम्हाला त्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाहीये, असं बोर्डातील एका सूत्राने ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. 2023 च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शमी भारताकडून शेवटचा खेळला होता.
वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर
2024 मध्ये शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली, ज्यामुळे त्याला जवळजवळ एक वर्ष सर्वच प्रकारच्या क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला टी-20 सामन्यांमधून पुनरागमन केले. नंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय संघाकडून खेळला होता. मात्र, त्याने महत्त्वाच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही. यामध्ये प्रमुख्याने ऑस्ट्रेलियात नुकताच पार पडलेला टी-20 विश्वचषक आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचाही समावेश होता.
भारताचा कर्णधार कोण?
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय निवड समिती रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून कसोटी क्रिकेटसाठी नवीन कर्णधाराची अधिकृत घोषणा उद्या करणार आहे. शुभमन गिल हा भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलची अलीकडेच संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याबरोबर सविस्तर बैठक झाली आहे.
शमी नसेल तर नव्या खेळाडूला मिळणार संधी?
मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमुळे संघात नवीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. यामध्ये डावखुरा अर्शदीप सिंग आणि हरियाणाचा उजव्या हाताचा गोलंदाज अंशुल कंबोज यांच्याकडे प्रमुख पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. कंबोजने आतापर्यंत 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघात त्यांचा आधीच समावेश करण्यात आला आहे. तर अर्शदीप सिंगला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने काउंटी क्रिकेटमध्ये केंटसाठी चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे अर्शदीप या दौऱ्यात ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतो. अशा परिस्थितीत, निवड समिती त्याच्या अनुभवाचा आणि स्विंग गोलंदाजीचा विचार करून त्याला संधी देण्याचा गांभीर्याने विचार करू शकते, असं मानलं जात आहे.
[ad_2]