येवला, प्रतिनिधी : अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य विट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, राजापूर येथील कृष्णा सोनवणे यांना अखिल भारतीय प्रजापती कुंभार महासंघ दिल्ली या संघटनेच्या वतीने उद्योग क्षेत्रातला प्रजापती भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून अखिल महाराष्ट्र कुंभार समाज संस्थेच्या पुढाकाराने राजापूर-ममदापूर रस्त्यावर स्वतंत्रपणे जागा घेऊन या ठिकाणी भव्य नाशिक पॉटरी क्लस्टर उभे राहिले आहे.महाराष्ट्रातील एकमेव व पहिले माती क्लस्टर केंद्रात प्रामुख्याने कुंभार व्यवसायाला आधुनिक टच देऊन चालना देण्याचा हेतू आहे.गेल्या दीड-दोन वर्षापासून हे काम वेगाने सुरू होते.
यासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनाने खादी ग्रामोद्योग मंडळ या संस्थेने अर्थसाहाय्यातून उपलब्ध झाला असून सुमारे ३७ लाख रुपये कुंभार समाज संस्थेने गुंतवले आहे.या क्लस्टरच्या उभारणीत श्री. सोनवणे यांचा सिंहाचा वाटा राहिला असून या माध्यमातून कुंभार समाजाला नवा रोजगार मिळणार आहे.याशिवाय कुंभार संघटनेच्या माध्यमातून समाज बांधवांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी श्री. सोनवणे अवव्याहतपणे योगदान देत आहेत.पिंपळस येथे स्वतःचा व्यवसाय देखील अतिशय यशस्वीपणे त्यांनी उभा केला असून या सर्व योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आळंदी येथे घेण्यात आलेला अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ या कार्यक्रमांमध्ये संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश कुंकळेकर, राष्ट्रीय संयोजक बी. के. प्रजापती,माती कला सेलचे अध्यक्ष दत्ताभाऊ डाळसकर,महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ सूर्यवंशी,राष्ट्रीय महासचिव मनोज प्रजापत,संघटनेचे राष्ट्रीय सेक्रेटरी ज्ञानेश्वर भागवत,वरिष्ठ सल्लागार सोमनाथ सोनवणे आदींच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.आळंदी येथील भव्य दिव्य सोहळ्यात सोनवणे यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला.