देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
माणूसकीला काळीमा फासणारी अशी घटना राहुरी तालुक्यातील बाभुळगाव शिवारात दि. १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सावत्र बापाने आपल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करुन तीच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले. नराधम बापाला पोलिस पथकाने ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले.
मध्य प्रदेश येथील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील एक महिला गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथे तीची ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी, मुलगा तसेच दुसरा पती यांच्यासह राहते. दि. १ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजे दरम्यान त्या अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप आरोपी राजेश अकांडे हा गावातून अंडी घेऊन देतो असे सांगून त्या अल्पवयीन मुलीला घेऊन घराबाहेर गेला. नंतर त्या नराधम सावत्र बापाने बाभुळगाव शिवारात त्या अल्पवयीन मुलीला चापटीने मारहाण करुन तीच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पिडीत मुलीच्या आईला घटना समजल्यावर ती तीची मुलगी व मूलाला घेऊन घरातून बाहेर पडली. रात्रीच्या वेळी रस्त्याने जात असताना एका तरुणाने पिडीत महिलेची चौकशी केली. तीला आधार देऊन बाभुळगाव परिसरातील एका वस्तीवर नेले. तेव्हा महिलेने ११२ नंबरवर फोन करुन घडलेला प्रकार सांगीतला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक समाधान फडोळ, हवालदार वाल्मीक पारधी, प्रवीण आहिरे, संतोष राठोड, गणेश सानप, जयदीप बडे आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. पोलीस पथकाने आरोपीला आज पहाटेच्या सुमारास बाभुळगाव येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गजाआड केले.
पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी राजेश रामपाल अकांडे, रा. बऱ्हाणपूर जिल्हा, मध्य प्रदेश, हल्ली रा. बाभुळगाव, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ६१८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२), ११५ (२) तसेच पोस्को कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे बलात्कार व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक ज्योती डोके ह्या करीत आहे. मात्र माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.