[ad_1]
IPL 2025 Final RCB Beat PBKS By 6 Runs Hardik Pandya Comment: इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वात अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपलं मागील 18 वर्षांपासूनच अपूर्ण स्वप्न पूर्ण केलं. आरसीबी हा सामना जिंकणार असं स्पष्ट झाल्यानंतर मैदानामध्येच विराट कोहलीला रडू कोसळलं. मागील 18 वर्षांपासून एकाच आयपीएल संघासाठी खेळणार एकमेव खेळाडू अशी ओळख असलेल्या विराटने या विजयानंतर आपलं स्वप्न साकार झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. मी माझ्या तरुणपणापासून ते आतापर्यंत सर्वकाही या संघासाठी दिलं आहे. त्यामुळे आजचा हा क्षण अवर्णनिय असल्याचं म्हटलं. या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलताना विराटने क्रृणाल पांड्याच्या गोलंदाजीचंही कौतुक केलं. अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या क्रृणालने 4 ओव्हरमध्ये 17 धावा देत 2 बळी घेतले. त्याने टाकलेल्या चार ओव्हर निर्णायक ठरल्या. क्रृणालसाठी हा चौथा आयपीएल चषक असला तरी बंगळुरुकडून त्याचाही हा पहिलाच चषक ठरला. यापूर्वी त्याने मुंबईच्या संघातून खेळताना तीन वेळा आयपीएल विजेत्या संघासाठी योगदान दिलं आहे.
आमच्याकडे 9 ट्रॉफी
सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार मिळाल्यावर रवी शास्री यांच्याशी चर्चा करताना क्रृणालने पांड्या भावंडांकडे आता 9 आयपीएल चषक झाले आहेत असं म्हटलं. मुंबई इंडियन्सने जिंकलेल्या पाचही आयपीएल पर्वांमध्ये हार्दिक आणि क्रृणाल या संघाचा भाग होते. त्यानंतर हार्दिकने पहिल्यांदाच गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना थेट चषकच या संघाला जिंकून दिलेला आणि आता क्रृणालने चषकावर आरसीबीकडून खेळताना नाव कोरलं आहे. क्रृणालच्या गोलंदाजीमुळेच सामना आरसीबीच्या बाजूने फिरल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे प्लेऑफच्या शर्यतीत पंजाबकडूनच मोठा पराभव सहन करावा लागल्याने बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या कालचा सामना पाहून घरात बसून रडत होता. त्यानेच हा खुलासा केला आहे.
हार्दिक घरात बसून रडत होता कारण…
मुंबई यंदाच्या आयपीएलच्या ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्यावर टीका करण्यात आली. त्याने कर्णधारपद भूषवताना योग्य निर्णय घेतले नाहीत असं अनेकांनी म्हटलं. मात्र दुसरीकडे हार्दिचा थोरला भाऊ क्रृणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीची चमक दाखवत आरसीबीच्या संघाला पहिलं-वहिलं जेतेपद जिंकवून दिलं. या सामन्यानंतर हार्दिक पंड्याने त्याच्या भावाचा सामन्यातील फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. हात उंचावून विकेट सेलिब्रेट करणाऱ्या क्रृणालचा फोटो पोस्ट करत त्यावर हार्दिकने, “डोळे भरुन आलेत… तुझा फार अभिमान वाटतो भावा” अशी कॅप्शन दिली आहे. त्याने नजर लागू नये यासाठी वापरला जाणारा इव्हिल्स आय आणि हार्टचा इमोजी या कॅप्शनमध्ये वापरलाय.
सचिनचीही खास पोस्ट
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरनेही 18 या आकड्याच्या योगायोगाचा उल्लेख करत दोन्ही संघांचं कौतुक इन्स्टाग्राम स्टेटसमधून केलं आहे. “पहिलं आयपीएल टायटल जिंकल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं अभिनंदन! 18 व्या पर्वाची ट्रॉफी 18 नंबरच्या जर्सीने उचलली हे फारच उत्तम झालं. फार छान खेळलात आणि तुम्ही यासाठी पात्र होताच,” असं सचिन म्हणाला आहे. स्टेटसच्या शेवटच्या ओळीत सचिनने, “पंजाब किंग्सचंही अभिनंदन त्यांनी या पर्वात फार छान झुंज दिली,” असं म्हटलं आहे.
सध्या हार्दिक आणि सचिनच्या या इन्स्टाग्राम स्टोरींचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.
[ad_2]