वीर वाजेकर महाविद्यालयातर्फे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

0
IMG-20250605-WA0086.jpg

उरण  (विठ्ठल ममताबादे ) रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) वतीने उरण तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.”प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा” (Beat Plastic Pollution) या २०२५ च्या जागतिक पर्यावरण दिनाच्या घोषवाक्याला अनुसरून, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिकविरहित जीवनशैलीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत दिघोडे येथील महात्मा गांधी विद्यालय, बापूजी देव मंदिर परिसर, खारपाटील महाविद्यालय चिरनेर आणि रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल पिरकोन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच चिरनेर येथील बापूजी देव देवराई परिसरात स्वच्छता मोहिमाही राबविण्यात आली.

या कार्यक्रमास वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, उपप्राचार्य गजानन चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. राम गोसावी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विभाग प्रमुख डॉ. राजकुमार कांबळे, यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक फल्ले सर, चिरनेर येथील खारपाटील हायस्कूलचे प्राचार्य पट्टेबहादूर सर, पिरकोन येथील शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख  जीवन गावंड, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निकेतन रमेश ठाकूर तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) चिरनेर संस्थेचे  दिनेश चिरनेरकर हेही विविध ठिकाणी संपन्न झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते.

महाविद्यालयाच्या वतीने चिंच, कडुलिंब, आवळा, पिंपळ आणि करंज अशी विविध प्रकारची सुमारे १०० झाडे लावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here