कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील भवानी चौक परिसरात चाॅपर व लाकडी दांड्याने तरुणास गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली . याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्या चौघांविरुद्ध गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की ,कोपरगाव शहरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड वय 23 याला गुरुवारी 26 जून रोजी रात्री भवानी चौक कोपरगाव येथुन जात असताना त्या ठिकाणी आरोपी हर्षल रोकडे त्याचे साथीदार रोहित कुंडारे, गणेश रोकडे व वैभव कुराडे सर्व राहणार गांधीनगर यांनी गच्ची धरुन शिवीगाळ करत बेसबॉलच्या दांड्याने ,पाईपने तसेच उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या मारहाणीत रूपेश गंभीर जखमी झाला असून. मारहाण झालेल्या ठिकाणी कोयते, दांडे आणि रुपेशच्या रक्ताचे थारोळे साचले होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेली ही गंभीर घटना पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. रात्री उशिरा एका तरुणावर प्राणघातक हल्ला होतो, आणि दुसरीकडे पोलीस मात्र 10 नंतर गाव बंद करताना अथवा हेल्मेट-लायसन्स तपासणी करताना सक्रिय दिसतात. त्यमुळे शहरातील घरफोडी, वाहनचोरी, हाणामारी सारख्या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
कोपरगाव शहरांमध्ये नव्यानेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे दाखल झाले असून त्यांच्यापुढे कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्यात प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मटका ,जुगार, अनधिकृत दारू विक्री अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांचे आव्हान तर आहेतच परंतु कोपरगाव शहरातील टोळी युद्ध गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी किंवा त्याच्यावरती थोडा बहुत अंकुश लावण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची गरज सध्या तरी असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.