[ad_1]
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी क्रिकेट संघासमोर नवं आव्हान उभं राहिलेलं असतानाच जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध नसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, 20 जूनला पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. बीसीसीआय 24 मे रोजी अधिकृतपणे संघाची घोषणा करणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन यांच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान या दौऱ्यात अनेक नवख्या खेळाडूंनाही खेळण्याची संधी आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह सर्वच्या सर्व पाच सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याने बीसीसीआयला आपलं शरीर तीनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्यास सक्षम नसल्याचं कळवलं आहे.
बुमराहने ऑस्ट्रेलियाविरोधातील सर्व पाच कसोटी सामने खेळले होते. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. भारताने ही मालिका 1-3 ने गमावली होती. रोहित शर्माने खराब फॉर्ममुळे अंतिम सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. बुमराह संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध नसणं मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पर्याय म्हणून मोहम्मद शमी इंग्लंडला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान गौतम गंभीरने पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर भाष्य केलं असून, त्या दोघांची जागा घेणे कठण असेल तरी पुढील पिढी आता जबाबदारी घेण्यास तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
“हो, आम्हाला दोन वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळावं लागणार आहे. कधीकधी ही इतर खेळाडूंसाठी संधी असते, ज्यांनी पुढाकार घेऊन आता आम्ही तयार आहोत असं सांगण्यासाठी. त्यामुळे हे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. पण काहीजण नक्कीच जबाबदारी घेण्यासाटी पुढाकार घेतील. मला याआधीही यासंबंधी विचारणा झाली होती,” असं गौतम गंभीरने Cricket Next शी बोलताना म्हटलं.
गौतम गंभीरने याला दुजोरा देताना भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचं उदाहरण दिलं. जसप्रीत बुमराह अनुपस्थित असतानाही भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्याची आठवण त्याने करुन दिली. गंभीर म्हणाला की, “चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्येही जसप्रीत बुमराह खेळत नव्हता. तेव्हाही मी हीच गोष्ट बोललो होतो. एखाद्याची अनुपस्थिती एखाद्याकडे देशासाठी काहीतरी मोठं करण्याची संधी असते. काही खेळाडू या संधीची वाट पाहत असतील अशी आशा आहे”.
[ad_2]