डाँ.तनपुरे कारखाना निवडणूक वार्तापत्र (राजेंद्र उंडे)
देवळाली प्रवरा ;
राहुरी तालुक्याची आर्थिक कामधेनू असलेल्या व सध्या गेल्या चार वर्षांपासून दिवाळखोरीत निघालेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, या निवडणुकीची हवा अद्याप तापलेली नाही. या निवडणूकीतून विखे कर्डिले गटाने आपले हात झटकून माघार घेतल्याने निवडणुकीतील राजकीय रंगत केव्हाच निघून गेली आहे. आता या निवडणुकीत तिरंगी लढत होत असून या निवडणुकीत कोण किंगमेकर ठरणार? यावरच आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. कारखाना निवणूकीत कामगारांचे मंडळ उतरणार असल्याचे जाहिर केले. परंतू हा बार फुसका निघाला.दरम्यान, दि. २१ मे रोजी कारखान्याच्या कामगारांनीराहुरी फॅक्टरी येथे कारखाना कार्यस्थळावर बैठक आयोजित केली असून त्यात आपल्या १३५ कोटी रुपयांच्या थकीत पगाराबाबत निवडणूक लढविणाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
सत्ताधिशांबरोबरच कामगारही पापाचे धनी आहेत? याबाबत सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या ३५ वर्षापासून हा कारखाना राजकीय दृष्टचक्रात अडकला. तेव्हापासून त्याला आर्थिक घरघर लागली. धुमाळ आणि तनपुरे यांच्यासह विखे आणि कर्डिलेही या कारखान्याच्या आर्थिक अरिष्टाला बेजबाबदार ठरले. ते कारखान्यातील पापाचे वाटेकरी होत असतानाच कारखान्याचे कामगारही पापाचे धनी बनले आहेत. काम न करता शेतकरी ऊस उत्पादकांच्या घामातून उभा राहिलेला हा कारखाना डबघाईस आणण्यात त्यांचाही तेवढाच वाटा असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. संलग्न संस्थांची व कारखान्याच्या जमिनींची वाट लागल्यानंतर कारखान्याची मशिनरी पळविणाऱ्यांचाही या निवडणुकीत सफाया करण्याचा मनोदय सभासदांनी बोलून दाखविला आहे.
डॉ. तनपुरे कारखान्याच्या गेल्या ३५ वर्षांतील सत्ताकारणाचे सिंहावलोकन केले तर अनेक धक्कादायक राजकीय गोष्टी चव्हाट्यावर येतील. तनपुरे कारखान्याच्या धुराड्यातून ३५ वर्षापूर्वी सोन्याचा धूर निघत असल्याचे प्रत्यक्षदर्शी जुने जाणते शेतकरी सांगतात. आज मात्र, हा कारखाना अगदीच भंगारात जमा झाल्याची शोकांतिका आहे. या कारखान्यावर तनपुरे व धुमाळ यांनी आलटून पालटून सत्तेचा मलिदा चाखला. त्यांच्याच कार्यकाळात कारखान्याची अगदीच धूळधाण होऊन हा कारखाना राजकारणाचा अड्डा बनला. त्यावर अवलंबून असलेल्या कामगार, व्यापारी व शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले.. मात्र, या सत्ताधिशांचे अडवाअडवी अन्जि रवाजिरवीचे राजकारण काही थांबले नाही. आजमितीला या कारखान्यावर सुमारे ३०० कोटी रुपयांहून अधिक कर्जाचा बोजा आहे. तर कष्टकरी कामगारांचे सुमारे १३५ कोटी रुपयांचे पगार व इतर देणी थकलेले आहेत. तर सध्या हा कारखाना जिल्हा बँकेकडे गहाण पडलेला असून चार वेळा लिलावाची बोली लावूनही त्याला चालविणारा कर्ताकरविता मिळाला नाही. त्यामुळे या कारखान्याचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे. तनपुरे व धुमाळ यांनी या कारखान्याची पुरती दुर्दशा केल्याचा आरोप ऊस उत्पादक सभासद खासगीत करतात. कर्जाचा भार घेऊन अगदीच मरणासन्न अवस्थेत असलेल्या या कामधेनूच्या निवडणूकीसाठी अबतक ५६ उमेद्वार रिंगणात उतरलेले आहेत. बंद पडलेल्या कारखाना निवडणुकीत एवढे उमेद्वार ? तो एक चेष्टेचा विषय बनला आहे.
दि. ३१ मे रोजी या कारखान्यासाठी मतदान होणार आहे. कारखाना बचाव कृती समिती, शेतकरी विकास मंडळ आणि तनपुरे प्रणित जनसेवा मंडळ या तीन गटात लढत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्यावर सत्तेचा गड सांभाळणारे माजी खा. प्रसाद तनपुरे सध्या निवडणुकीपासून अलिप्त आहेत. तर माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या निवडणुकीबाबत हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवलेले आहे. दुसरीकडे धुमाळ यांनी स्थापन केलेले विकास मंडळ या निवडणुकीत वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहे. तर विखे कर्डिले गटाने या निवडणुकीत ‘रणछोडदासा’ची भूमिका घेतल्याने कारखान्याला वाली कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे. शेतकरी मंडळाचे राजूभाऊ शेटे यांनी कारखाना चालू होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तर कारखाना बचाव कृती समितीनेही अमृत धुमाळ, अरुण कडू,अँड अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली पदरमोड करून कारखान्याच्या अस्तित्वासाठी न्यायालयीन लढा दिला.अवघ्या जागांवर निवडणूक लढवून एकाकी झुंज देत आहेत. जनसेवा मंडळाच्या नेतृत्वाची धुरा बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. सहकारी संस्था सक्षमपणे चालविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे या तिनही गटाबाबत सकारात्मक राजकीय वातावरण असून कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, कारखान्याच्या कामगारांनीही आता आपल्या पगार वसुलीची नामी संधी हुडकून दि. २१ मे रोजी होणाऱ्या बैठकीत या तिनही मंडळाला आपल्या थकीत पगाराचे काय? याबाबत कात्रीत पकडण्याचे कसब साधले आहे. सुमारे ८० टक्के कामगार कारखान्याचे सभासद आहेत. त्यातील काही कामगारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या वळणावर जात असतानाच अद्यापही या तिन्ही गटांचे ताबूत थंड असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
डाँ.तनपुरेंच्या कामगारांचा फुसका बार ?
डाँ.तनपुरे कारखान्यात कामगार आहेत त्यापैकी तीन हजार कामगार सभासद आहेत.कारखान्याचे एकुण मतदान ४ हजार ६०० मतदार आहेत.कामगार सभासद मतदारांची संख्या जास्त असल्याने कामगार मेळाव्यात साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी सचिन काळे यांनी कामगार या निवडणूकीत स्वतंत्र पँनल तयार करणार असल्याचे जाहिर केले होते.परंतू अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत एक हि कामगार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढे न आल्याने साखर कामगार युनियने टाकलेला बाँम्ब फुसका निघाल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे. कामगारांनी मात्र स्वतःच्या थकीत पगारासाठी तीन ही मंडळाच्या उमेदवारांना कात्रित पकडे आहे. परंतू या बंद पडलेल्या कारखान्याच्या पापाचे धनी आपणही आहोत हे विसरुन चालणार नाही.