तालुक्यातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोपरगांव प्रतिनिधी :
ज्ञान हा प्रत्येकाचा दागिना आहे, दहावी-बारावी शिक्षण घेवून अभियांत्रिकी तांत्रिक शिक्षणातुन जगाच्या पाठीवर चमकणारे तारे घडविण्याचे काम माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतुन केले असे प्रतिपादन माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
संजीवनी उद्योग समूह व संजीवनी युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने तालुक्यातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला त्याप्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. याप्रसंगी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेबरोबरच सरस्वती पुजन करण्यांत आले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतुन तीस वर्षापासुन हा उपक्रम सुरू असल्याचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
संजीवनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकुर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत असुन स्टार्टअप इंडियासह देश विदेशातील औद्योगिकीकरणांला कोणत्या पध्दतीचे अभ्यासक्रम हवे आहेत त्याचा पाया संजीवनी विद्यापीठात घातला जात आहे. मुला-मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यांचे शिक्षण येथे दिले जाते. दहावी बारावी नंतर काय याबाबत उच्च दर्जाचे मार्गदर्शन आणि ज्ञान शिकविले जाते.
प्रारंभी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमितदादा कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक करतांना म्हणाले की, ग्रामीण भागातील मुला मुलींना के. जी. पासून पी. जी पर्यंत तसेच पी.एच. डी चे दर्जेदार शिक्षण मिळावे हे स्वप्न माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी पाहिले आणि त्याच्या परिपुर्तीसाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी काळाच्या वेगाने पावले टाकत अचूकपणाने यातील संधी शोधल्या, जागतिक स्तरावरील नासा, इस्रो, टाटा, जिओ रिलायन्स यासह देश विदेशातील महत्वाच्या पदावर संजीवनीचा विद्यार्थी काम करतो आहे याचा आम्हास अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच गुणात्मक शिक्षणाला प्राधान्य द्यावे.
याप्रसंगी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. एम . व्ही. नागरहल्ली , के.बी.पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए . आर . मिरीकर, डॉ. समाधान दहिकर आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार व सुत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले.