[ad_1]
Kapil Dev on Bangalore Stampede: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएल विजयाच्या सेलिब्रेशन दरम्यान 11 चाहत्यांचा मृत्यू झाल्यानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सेलिब्रेशनपेक्षा आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे असं मत त्यांनी मांडलं असून, भविष्यात प्रत्येकाने योग्य काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. बुधवारी आपल्या आयपीएल विजेच्या संघाची झलक पाहण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमबाहेर आरसीबीच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. जवळपास अडीच लाख चाहते जमले होते. मात्र यावेळी मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जण जखमी झाले.
“मला खूप वाईट वाटत आहे. मला वाटतं आपण एकमेकांकडून शिकलं पाहिजे. पुढच्या वेळी असं काहीतरी (विजय परेड) घडेल तेव्हा लोकांनी अधिक जागरूक राहायला हवं. लोक चुका करतात,” असं कपिल देव यांनी आर्चे ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या कॉर्पोरेट कार्यक्रमादरम्यान पीटीआयला सांगितलं.
1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय कर्णधाराने संघांना आणि इतर भागधारकांना अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करताना संयम राखण्याचं आवाहन केलं. “चूक इतकी मोठी नसावी की तुम्ही मजा करत असता आणि जीव गमवावा लागतो. भविष्यात, जर कोणताही संघ जिंकला तर संयम राखा. आनंद साजरा करण्यापेक्षा जीव जास्त महत्त्वाचे आहेत,” असं ते पुढे म्हणाले.
दरम्यान कपिल देव यांनी यावेळी भारतीय संघ इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. “भारतीय संघाची बाजू जमेची आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ असून, जर त्यांनी संघ म्हणून चांगली खेळी केली तर निकालही चांगला असेल. शुभमनि गिल असो किंवा जसप्रीत बुमराह, हे एका खेळाडूबद्दल नसून टीमबद्दल आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते विजयी होतील अशी आशा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आपण आता गोल्फमध्ये अधिक व्यस्त असल्याचं कपिल देव म्हणाले. “मला वाटतं की क्रिकेट फक्त एका विशिष्ट वयापर्यंत खेळता येते, तुम्हाला माहिती आहे, टेनिस, फुटबॉलसारखे काही खेळ, तुम्ही 50 किंवा 60 वर्षांच्या वयात खेळू शकत नाही. पण जेव्हा मी गोल्फ खेळायला सुरुवात केली तेव्हा मला वाटले की तुम्हाला हवे तोपर्यंत खेळू शकतो. आणि जर तुम्ही काहीतरी खेळत राहिलात तर एक खेळाडू म्हणून ते अद्भुत आहे”, असं त्यांनी म्हटलं.
“गोल्फने मला अशी ताकद दिली आहे की मी स्वतःशी स्पर्धा करू शकतो,” असंही 66 वर्षीय कपिल देव म्हणाले. कपिल देव प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष देखील आहेत.
[ad_2]