दौड-रावणगाव, परशुराम निखळे :
सुमारे 300वर्षापूर्वींचा ऐतिहासिक वारसा असलेल्या स्वामीचिंचोली येथील श्रीराम मंदिर येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी रामनवमीनिमित्त यात्रेचे जंगी आयोजन यात्रा कमिटीने मग केलेले आहे. रामनवमी दिवशी किर्तनकार- श्री विकास दिग्रसकर यांचे कीर्तन आहे.तर ह.भ. प.ज्ञानेश्वर महाराज पाहणे यांची सुश्राव्य अशी रामायण कथा सप्ताहाचे आयोजन गुढीपाडव्या पासून केलेले आहे.याचबरोबर मनोरंजना साठी चंद्रकांत ढवळपुरीकर सह किरणकुमार ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित आहे.तसेच 7 तारखेला पाच वाजता कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच पूनम मदने यांनी दिली.
स्वामीचिंचोलीतील श्रीराम मंदिर हे 300वर्षांपूर्वीचे पेशवेकालीन मंदिर असून या मंदिरात समर्थ रामदास स्वामींचे शिष्य तुकाराम स्वामींची समाधी आहे.तुकाराम स्वामींच्या नावावरूनच चिंचोली गावाचे नाव स्वामीचिंचोली पडले आहे. पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आहे.यात्रा कालावधीत ग्रामपंचायत स्वामीचिंचोली यांच्याकडून पाण्यासाठी टँकरची सुविधा,परिसर स्वच्छता,तसेच कुस्ती आखाड्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे-चव्हाण यांनी दिली.
यात्रा कालावधीमध्ये सर्वांनी गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. यात्रेकरिता पोलीस बंदोबस्त,चोवीस तास वीज आणि पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे”. श्रीरामनवमी यात्रेनिमित्त जास्तीत भाविकांनी श्रीरामदर्शनाचा लाभ घ्यावा व यात्रेची शोभा वाढवावी” असे आवाहन सरपंच -सौ.पूनम मदने आणि स्वाती लोंढे-चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी यांनी केले आहे.