[ad_1]
IPL 2025 : भारत – पाकिस्तान तणाव परिस्थितीमुळे एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 ही स्पर्धा आता पुन्हा एकदा सुरु होणार आहे. यासाठीच नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून 17 मे पासून स्पर्धेला पुन्हा सुरुवात होईल. मात्र याकरता केवळ 2 दिवस शिल्लक असताना आयपीएल सामन्याचं ठिकाण असणार एक स्टेडियम बॉम्बने उडवण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे.
जयपूरच्या मानसिंह स्टेडियमला गेल्या सात दिवसात ही चौथी धमकी देण्यात आली असून हे स्टेडियम बॉम्बने उडवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच सर्वच सुरक्षा व्यवस्था सतर्क झाल्या असून या धमकीचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. राजस्थान पोलिसांनी या स्टेडियमची सुरक्षा वाढवली आहे.
धमकीत काय लिहिलंय?
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमबाबत धमकीचा ईमेल मिळाला आहे. यात असं लिहिण्यात आलंय की, ‘पाकिस्तानशी पंगा घेऊ नका. आमची भारतात स्लीपर सेल आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी हॉस्पिटल सुद्धा बॉम्बने उडवून देऊ’. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत स्टेडियमला वारंवार धमक्या येत असल्याने सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली असून स्टेडियमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच हा धमकीचा मेल नेमका कुठून आलाय याबाबत सुद्धा अधिकारी तपास करत आहेत. विदेशी स्लीपर सेल्स आणि दहशतवादविरोधी कारवायांचा बदला घेण्यासाठी दहशत पसरवण्याचा संघटित प्रयत्न असण्याची शक्यता तपासली जात आहे. मेट्रो स्थानके, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
18 मे रोजी होणार सामना :
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रविवार 18 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. मात्र सामन्याला तीन दिवस शिल्लक असताना आलेल्या या धमकीमुळे स्टेडियमची सुरक्षा वाढवली आहे. राजस्थान खेळ परिषदेच्या अधिकृत इमेल आयडीवर हा मेल पाठवण्यात आला आहे. या ईमेलचा विषय ‘एचएमएक्स बम विस्फोट सवाई मानसिंह स्टेडियम ऑपरेशन प्रभाकर दिविज’ असा होता.
काय म्हणाले क्रीडा परिषदेचे अध्यक्ष?
बॉम्ब हल्ल्याच्या धमकीच्या बातमीची पुष्टी करताना क्रीडा परिषदेचे अध्यक्ष नीरज के पवन म्हणाले की, ‘बॉम्बच्या धमक्या लक्षात घेऊन राज्य सरकारने यावेळी अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. ते सुरक्षा उपाय वाढवत असून,अतिरिक्त पोलिस आणि बाउन्सर्स तैनात करण्यात येणार आहेत. तसेच आम्ही कॅमेर्यांची संख्या वाढविली आहे आणि खराब कॅमेरे दुरुस्त केले आहेत’. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर आयपीएल 2025 चे 3 लीग स्टेज सामने खेळवले जाणार आहेत. यात रविवार 18 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स , 24 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली आणि 26 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचा समावेश आहे. यापूर्वी देखील अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम, कोलकाताचं इडन गार्डन स्टेडियम, दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम इत्यादी स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
[ad_2]